marathi mol

जीवन विमा बद्दल संपूर्ण माहिती Life Insurance In Marathi

Life Insurance In Marathi जीवन विमा योजनेद्वारे पॉलिसीधारक व्यक्तीला आपले व आपल्या प्रियजनांचे भविष्य सुरक्षित करता येते. जीवन विमा हा पॉलिसीधारक व पॉलिसी प्रदाता यांच्यामधील ठराविक कालावधीसाठी असणारा करार आहे ज्यामध्ये विमा कंपनी पॉलिसीधारक व त्याच्या कुटुंबास जीवन विमा कवच प्रदान करतो.

Life Insurance In Marathi

जीवन विमा बद्दल संपूर्ण माहिती Life Insurance In Marathi

या लेखात आम्ही जीवन विमा संदर्भातील माहिती त्याचे फायदे, त्यातील विविध प्रकार, जीवन विमा योजना पुरवणाऱ्या कंपन्या तसेच इतर महत्त्वाची माहिती नमूद करण्याचा प्रयत्न केला आहे.

जीवन विमा :-

जीवन विमा हा पॉलिसीधारक व्यक्ती व पॉलिसी प्रदाता संस्था यांच्यामध्ये ठराविक कालावधीसाठी होणारा करार आहे ज्यामध्ये पॉलिसी प्रदाता पॉलिसीधारक व्यक्तीस व त्याच्या कुटुंबियांस आर्थिक कवच प्रदान करते व त्याबदल्यात पॉलिसी धारकास पॉलिसी प्रदाता कंपनीने ठरवून दिलेली रक्कम मासिक हप्तामध्ये भरावी लागते.

काही जीवन विमा योजनेमध्ये पॉलिसी धारकास पॉलिसी परिपक्वतेचे देखील फायदे मिळतात तर पॉलिसीधारक व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्यावर अवलंबून असणाऱ्या व्यक्तींना पॉलिसी प्रदाता कंपनी मृत्यूलाभ प्रदान करते.

जीवन विमाचे फायदे :-

अनेक बँका तसेच संस्था जीवन विमासाठी विविध योजना ग्राहकांसमोर उपलब्ध करून देते. या योजनांद्वारा पॉलिसी धारकास खाली दिलेल्या बाबींप्रमाणे लाभ मिळवता येतो.

  • पॉलिसी प्रदाता संस्था विमाधारकास विहित कालावधीसाठी जीवन विमा कवच प्रदान करते
  • ही योजना निवृत्तीनंतरच्या काळासाठी केलेल्या बचतीप्रमाणे ग्राहकास उपयुक्त आहे
  • पॉलिसीधारक व्यक्तीच्या मृत्यूनंतर पॉलिसीधारक व्यक्तीवर अवलंबून असणाऱ्या व्यक्तींना मृत्यू लाभ मिळवता येतो.
  • काही योजनांमध्ये पॉलिसीधारक व्यक्तीस जीवन विमा पॉलिसीवर कर्ज मिळवता येते.
  • प्राप्तिकर कायदा कलम ८० सी अनुसार पॉलिसीधारक व्यक्तीस कर लाभ मिळवता येतो

जीवन विमा योजनेचे विविध प्रकार :-

जीवन विमा योजनेचे मुख्य तीन प्रकार आहेत :-

१) आजीवन विमा (whole Life Insurance)
२) टर्म जीवन विमा (term life insurance)
३) युनिव्हर्सल जीवन विमा (universal life insurance)

तर चला प्रत्येक योजनेबद्दल संक्षिप्त स्वरूपात जाणून घेऊया.

१) आजीवन विमा (whole Life Insurance) :

या योजने अंतर्गत विमाधारकाला त्याच्या वयाच्या 100 पर्यंत विमा कवच दिले जाते. या योजनेअंतर्गत पॉलिसीधारकाला ठराविक कालावधीसाठी विशिष्ट रक्कम प्रीमियम म्हणून हप्त्याच्या स्वरूपात भरावी लागते. बहुतांश पॉलिसी प्रदात्यांच्या अनुसार आजीवन विमा ही पॉलिसी पॉलिसीधारकाने वयाची शंभरी पूर्ण केल्यानंतर किंवा पॉलिसीधारकाच्या मृत्युनंतर परिपक्व होते.

आजीवन विमा योजनेमध्ये विमाधारकाने भरलेल्या प्रीमियमचा काही भाग cash value म्हणून गुंतवला जातो व या रकमेवर किमान व्याजदर आकारून ही रक्कम वाढवली जाते.

विमा कालावधीमध्ये पॉलिसी धारकाचा नैसर्गिक किंवा अपघाती मृत्यू झाल्यास पॉलिसी धारकाने nominee म्हणून नमूद केलेल्या व्यक्तींना विमा कंपनी मृत्यूलाभ प्रदान करते.
तसेच या योजनेमध्ये विमाधारकाला आपात्कालीन कर्जदेखील मिळवता येते व या कर्जाची परतफेड विमाधारकाला विमा कालावधी मध्ये करावी लागते किंवा परिपक्वता लाभ राशीमधून वजा केली जाते.

२) टर्म जीवन विमा (term life insurance) :

या योजनेअंतर्गत विमा कंपनी विमाधारकास मर्यादित कालावधीसाठी विमासुरक्षा कवच प्रदान करते. ही विमा योजना इतर योजनांपेक्षा स्वस्त आहे व यामध्ये भरावी लागणारी प्रीमियमची रक्कम ही संपूर्ण टर्म कालावधीसाठी सारखीच असते. या योजनेमध्ये पॉलिसी धारकाच्या मृत्यूनंतर nominee म्हणून असणाऱ्या व्यक्तीस मृत्यू लाभ मिळतो व ही रक्कम एकरकमी स्वरूपात किंवा मासिक स्वरूपात तसेच काही योजनांमध्ये दोन्ही स्वरूपात दिली जाते.

या योजनेमध्ये असणारा टर्म कालावधी हा विमाधारकाला निवडता येतो तसेच यामध्ये विमा कालावधीमध्ये विमा कवचाची रक्कम कमी किंवा जास्त करता येते. यामध्ये भरावी लागणारी प्रीमियमची रक्कम तुलनेने कमी असते. ही प्रीमियम रक्कम मासिक, त्रैमासिक, सहा महिने किंवा वार्षिक स्वरूपात भरता येते.

३) युनिव्हर्सल जीवन विमा (universal life insurance) :

युनिवर्सल जीवन विमा हा cash value विमा योजनेचा प्रकार आहे यामध्ये विमाधारकाने जमा केलेल्या रकमेला दोन भागात विभागले जाते. यातील एक भाग म्हणजे cost of insurance व दुसरा भाग म्हणजे cash value. यातील cash value हा भाग विमा कंपनीद्वारे इतर योजनांमध्ये गुंतवला जातो. व यातून मिळणाऱ्या व्याजामुळे ही रक्कम वाढत राहते.

तसेच या योजनेमध्ये विमाधारकाला विमा कालावधीमध्ये मृत्यू लाभ किंवा प्रीमियम रकमेमध्ये बदल करता येतो. या विमा योजनेमध्येही विमाधारकाला cash value वर आपात्कालीन कर्ज मिळवता येते. तसेच या योजनेमध्ये विमाधारकाला लॅप्स संरक्षण सुविधा उपलब्ध आहे.
या योजनेचे पॉलिसी धारकाला भराव्या लागणाऱ्या प्रीमियमनुसार खालील उपप्रकार पडतात.

१) सिंगल प्रीमियम युनिवर्सल जीवन विमा :- यामध्ये भरावे लागणारे प्रीमियमची रक्कम ही एक रकमी स्वरूपात भरली जाते
२) फिक्स प्रीमियम युनिवर्सल जीवन विमा :- या योजनेमध्ये पॉलिसी धारकास प्रीमियमची ठरलेली निश्चित रक्कम नियमित हप्त्याच्या स्वरूपात भरावी लागते.
३) फ्लेक्झिबल प्रीमियम युनिवर्सल जीवन विमा :- या योजनेमध्ये पॉलिसी धारकास प्रीमियमची रक्कम विमा कंपनीने ठरवून दिलेल्या मर्यादेमध्ये कमी-अधिक स्वरूपात भरता येते.

जीवन विमा दावा (Life Insurance claim) :-

जीवन विमा दाव्यामध्ये डेथ क्लेम व मॅच्युरिटी क्लेम असे दोन प्रकार पडतात.

१) मृत्यू दावा (death claim) :-

पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर मृत्यू लाभ मिळवण्यासाठी नॉमिनी म्हणून असणाऱ्या व्यक्तीला विमा कंपनीमध्ये मृत्यू दावा अर्ज करावा लागतो. यामध्ये नॉमिनी म्हणून असणाऱ्या व्यक्तीला सदर कागदपत्रे विमा कंपनीकडे सादर करावी लागतात: मृत्यूचा दाखला, वैद्यकीय प्रमाणपत्र, पॉलिसी करार पत्र, नॉमिनीचे ओळखपत्र इत्यादी.

२) परिपक्वता दावा (maturity claim) :-

ज्या जीवन विमा योजनांमध्ये परिपक्वता लाभ मिळतो अशा योजनांसाठी पॉलिसी धारकांना विमा कालावधी पार केल्यानंतर परिपक्वता दाव्यासाठी अर्ज करता येतो. परिपक्वता लाभ मिळवण्यासाठी विमाधारकाने सर्व प्रीमियम योग्यरीत्या भरलेले असणे गरजेचे आहे. यामध्ये विमा कालावधी पूर्ण होण्याअगोदर विमा कंपनी विमाधारकाला इंटीमेशन फॉर्म व डिस्चार्ज फॉर्म पाठवते.

यानंतर पॉलिसीधारकाला डिस्चार्ज फॉर्मवर सही करून तसेच इतर दोन साक्षीदारांची सही घेऊन हा फॉर्म विमा कंपनीमध्ये भरावा लागतो. या फॉर्मसोबत विमाधारकाला जीवन विमा कराराची मूळ प्रत, ओळख पत्र इत्यादी कागदपत्रे जमा करावी लागतात.

जीवन विमा योजनेवर मिळणारे कर्ज :-

काही जीवन विमा योजनांद्वारा पॉलिसीधारकाला आपात्कालीन कर्ज मिळवता येते. यामध्ये मिळणारी कर्जाची रक्कम विमा कंपनी विम्याच्या सरेंडर रकमेनुसार ठरवते.

या कर्जाची परतफेड पॉलिसी धारकांना विम्याच्या कालावधीमध्ये करावी लागते. काही योजनांमध्ये विमाधारकास विमा कालावधीमध्ये कर्जावरील व्याजदर भरावा लागतो व कर्जाची मूळ रक्कम मॅच्युरिटी बेनिफिट्समधून वजा केली जाते.

जीवन विमा योजनेमध्ये वापरले जाणारे विविध संज्ञा :

जीवन विमा योजनांमध्ये मुख्यतः पुढील संज्ञाचा वापर केला जातो. पॉलिसी बद्दल जाणून घेण्यासाठी या संज्ञांचा अर्थ माहीत असणे गरजेचे आहे.

१) विमाधारक/ पॉलिसीधारक (policy holder) :- जीवन विमाद्वारे ज्या व्यक्तीला विमा कवच दिले जाते त्या व्यक्तीस विमाधारक असे म्हणतात.
२) विमा कंपनी (insurance provider) :- विमा कंपनी किंवा बँक ग्राहकांना जीवन विम्याच्या विविध योजना उपलब्ध करून देतात.
३) परिपक्वता (Maturity) :- विमा योजनेचा कालावधी पूर्ण होणे म्हणजे विमा परिपक्वता असे म्हणतात
४) मॅच्युरिटी/ डेथ क्लेम :- विमा परिपक्व झाल्यानंतर किंवा विमाधारकाच्या मृत्यूनंतर मिळणाऱ्या फायद्यास मॅच्युरिटी/ डेथ क्लेम असे म्हणतात
५) मृत्यू लाभ (Death benefit) :- विमाधारकाच्या मृत्यूनंतर विमाधारकाववर अवलंबून असणाऱ्या व्यक्तीला मिळणाऱ्या रकमेला मृत्यू लाभ असे म्हणतात
६) कॅश व्हॅल्यू :- विमाधारकाने भरलेल्या रकमेचा काही भाग हा कॅश व्हॅल्यू म्हणून गुंतवला जातो व त्यावर मिळणाऱ्या व्याजामुळे कॅश व्हॅल्यू ची रक्कम वाढत जाते
७) प्रीमियम (Premium) :- विमा कवचाच्या बदल्यात विमाधारकाला ठराविक रक्कम हप्त्याच्या स्वरूपात भरावी लागते, याला प्रीमियम असे म्हणतात
८) विमा कालावधी (Term) :- विमा कंपनी अर्जदाराला मर्यादित कालावधीसाठी विमा संरक्षण देते, या कालावधीला विमा कालावधी असे म्हणतात.

जीवन विमा योजना उपलब्ध असलेल्या विमा कंपनी :-

भारतामध्ये अनेक बँका व इतर विमा कंपन्या जीवन विमा च्या विविध योजना उपलब्ध करून देत आहेत. यातील काही महत्त्वाच्या विमाकंपन्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत.

१) आदित्य बिर्ला सन लाइफ इन्शुरन्स
२) Aegon लाइफ इन्शुरन्स
३) एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स
४) भारती एक्सा लाइफ इन्शुरन्स
५) फ्युचर जनरली इंडिया लाइफ इन्शुरन्स
६) Ageas फेडराल लाइफ इन्शुरन्स
७) अविवा लाइफ इन्शुरन्स
८) बजाज आलियांज लाइफ इन्शुरन्स
९) आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स
१०) कॅनरा एचएसबीसी ओबीसी लाइफ इन्शुरन्स
११) एक्साइड लाइफ इन्शुरन्स

तर अशाप्रकारे जीवन विमा ही एक महत्वाची योजना आहे जी विमाधारकास व त्याच्या कुटुंबियांस आर्थिक कवच प्रदान करते म्हणून पॉलिसीधारकाने योग्यतेनुसार योजनेची निवड करणे गरजेचे आहे.

Share on:

माझे नाव प्रमोद तपासे आहेत मी प्यारी खबर या वेबसाईट चा संस्थापक आहेत. मला लिहिण्याची आवड असल्यामुळे मी विद्यार्थ्यांना या वेबसाईटद्वारे मदत करीत असतो.

Leave a Comment

error: Content is protected !!